सात लाखांची पाणी फिल्टर योजना धूळखात; उटी ग्रामस्थांमध्ये संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील उटी येथे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुमारे सात लाख रुपये खर्चाची पाणी फिल्टर योजना मंजूर केली होती. मात्र ही योजना आज धूळ खात पडल्याचे चित्र समोर आले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना उद्देशापासून दूर गेली आहे. शासनाने नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने योजना राबविली होती. मात्र प्रत्यक्षात फिल्टर यंत्रणा वापराविना पडून असल्याने शासनाच्या निधीचा योग्य उपयोग झाला नसल्याचा आरोप होत आहे.
जिओ-टॅगिंगद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये फिल्टर योजनेची दयनीय अवस्था स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना आजही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गावातील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहार व निधीच्या वापराबाबत चौकशीची मागणीही पुढे आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रामस्थांचे लक्ष आता या योजनेच्या चौकशीकडे लागले आहे. चौकशीनंतरच योजनेच्या अंमलबजावणीत नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या आणि जबाबदार कोण, हे स्पष्ट होणार आहे.



