हिमायतनगर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; प्रभाग क्र. १३ मध्ये नाल्या तुंबल्याने नागरिकांवर स्वतःच स्वच्छता करण्याची वेळ!

नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहून अखेर शेख इलियास यांनी स्वतःच नालीतील कचरा काढला; नागरिकांचा संताप
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वॉर्डातील नाल्यांमध्ये जमानेभरचा कचरा साचल्याने पाणी तुंबले असून मोठा पाऊस झाल्यास हे पाणी लोकांच्या घरात घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी येतील म्हणून नागरिक रोज वाट पाहत होते, पण कोणीच न आल्यामुळे अखेर शेख इलियास यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या घरासमोरील नाली साफ केली (काटली). सध्या पावसाळ्याचे दिवस असतानाही प्रभाग क्र. १३ मधील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. नाल्यांमधील कचरा आणि घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांना स्वतःच हातात लोखंडी सळ्या घेऊन नाल्या उपसण्याची वेळ आली आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप
”आम्ही कर भरूनही जर नगरपंचायत आणि आमचे नगरसेवक साध्या मूलभूत सुविधा देऊ शकत नसतील, तर त्यांचा काय फायदा?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर ‘लाथ’ मारत लोकांनी स्वतःच श्रमदान करून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आहे.
जर या प्रभागातील नाली तात्काळ दुरुस्त करून त्याची कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात आली नाही, तर येत्या काळात नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रभागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.



