पिक विमा तात्काळ द्या; अन्यथा चालू हंगामात बहिष्काराचा इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ, दि. २२ जून : यवतमाळ जिल्ह्यातील पिक विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सनियंत्रण सुनावणी सभेत शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना प्रलंबित पिक विमा तात्काळ अदा करण्याची मागणी केली.
शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येणारे कायदे व नियम बदलण्यात यावेत. प्रत्यक्ष शेतपातळीवरील पीक नुकसानीचा आधार घेऊन चालू खरीप हंगाम एक स्वतंत्र वर्ष म्हणून ग्राह्य धरत पिक विम्याची रक्कम देण्यात यावी. तसेच बदलत्या हवामानामुळे, अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तींमुळे कृषी उत्पादनात मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून त्यानुसार पिक विमा योजनेचे नवीन मॉडेल व धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी सध्याच्या पिक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या हिताचे आवश्यक बदल करण्यात यावेत, अन्यथा ही योजना बंद करण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी केली. तसेच गतवर्षीच्या खरीप हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर चालू खरीप हंगामात शेतकरी पिक विमा योजनेवर बहिष्कार टाकतील, असा इशाराही मनीष जाधव यांनी दिला.
सभेत उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनीही पिक विमा वितरणातील विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.



