महागाव नगरपंचायतीतील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये नाराजी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीच्या निविदा प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून विकासकामे रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायत अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांचे “नमो उद्यान” मंजूर झाले आहे. मात्र या कामासाठीची निविदा प्रक्रिया वारंवार राबविण्यात आल्याची चर्चा असून त्यामुळे कामाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे का, तसेच कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याशिवाय नगरपंचायत क्षेत्रातील रस्ते व नाल्यांच्या कामांसाठी सुमारे ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांच्या प्रस्तावित कामांची निविदा प्रक्रियाही अद्याप पूर्णत्वास गेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासाला विलंब होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
काही निविदा प्रक्रिया इतर ठिकाणाहून राबविण्याबाबतही चर्चा सुरू असून यामागे काही प्रभावशाली व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पातळीवर पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबवून मंजूर कामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडल्यास सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.



