महागाव नगरपंचायतीची स्वच्छता मोहीम ठरली केवळ फोटोसेशनपुरती?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : नगरपंचायतीकडून घनकचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर एक-दोन दिवस परिसरात स्वच्छता दिसून आली. मात्र त्यानंतर पुन्हा शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छता मोहिमेचा गाजावाजा करून प्रत्यक्षात केवळ फोटोसेशन करण्यात आले का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यात आलेल्या टेंडरची मुदत संपूनही कचरा संकलन व विल्हेवाटीची प्रभावी व्यवस्था उभी राहिलेली नाही. परिणामी अनेक ठिकाणी कचरा साचून दुर्गंधी पसरत असून माशा, डास व भटक्या जनावरांचा त्रास वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याने स्वच्छतेबाबत नगरपंचायतीचा निष्काळजीपणा उघड होत असल्याची चर्चा आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“शहरभर कचरा साचलेला असताना सत्ताधारी आणि प्रशासनाला जाग का येत नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून नगरपंचायतीने त्वरित प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.



