शहर

एकाग्रता, भावनिक नियंत्रण व सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी योग आवश्यक -प्राचार्य डॉ. माधव कदम

  एकाग्रता, भावनिक नियंत्रण व सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी योग आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. माधव कदम यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करताना उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. अभिजीत फुलबांधे यांनी उपस्थितांना अनुलोम-विलोम क्रियेसह  शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याबद्दलचे मार्गदर्शन करून सर्वांकडून प्राणायाम आणि योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले.
  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या पुढाकाराने 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. माधव कदम पुढे म्हणाले की, भारतीय प्राचीन संस्कृतीत योग, योगासने, योगसाधनेला खूप महत्त्व आहे. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवून मनावरही चांगले संस्कार करू शकतो. नियमित व्यायाम आणि योगासनांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. सर्वांनी नियमितपणे योगाचा सराव करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
   उपप्राचार्य प्रा.डॉ. नवीन जांभेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. त्रिरत्न भगत, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन प्रा. संतोष पाचकुडके, प्रा. डॉ. विठ्ठल जीवतोडे, प्रा. डॉ. प्रफुल्ल शिरभाते, प्रा. अशोक सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button