महागाव नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांना लागली ‘टक्केवारीची किड’ – शैलेश कोपरकर

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
नगरपंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी होण्यास वेळ लागणार नाही; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचा हल्लाबोल
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीतील सत्ताधारी पदाधिकारी व नगराध्यक्षांच्या पतीच्या कथित हस्तक्षेपामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली असून नगरपंचायतीचा कारभार जनहितापेक्षा टक्केवारीच्या राजकारणाभोवती फिरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक शैलेश कोपरकर यांनी केला आहे. शहरातील रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनातील कथित अनियमिततेबाबत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
महागाव शहरात रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक कामे मंजूर असूनही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप कोपरकर यांनी केला. काही विकासकामे जाणीवपूर्वक रोखून धरली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
“नगरपंचायतीत विकासकामांपेक्षा टक्केवारीला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला असून नागरिकांना त्याचा फटका बसत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कोपरकर यांनी नगराध्यक्षांच्या पती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दीपक आडे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनावर दबाव निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील मर्यादा जपल्या गेल्या पाहिजेत, मात्र प्रत्यक्षात निर्णय प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक व प्रशासकीय परिस्थिती आधीच बिकट झाली असून ती ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची चर्चा आहे. अशाच प्रकारचा कारभार नगरपंचायतीत सुरू राहिला तर नगरपंचायतीचीही अवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही कोपरकर यांनी दिला.
नगरपंचायत कार्यालयात विविध दाखले, प्रमाणपत्रे व इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. सामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शहराच्या विकासासाठी उपलब्ध झालेला निधी पारदर्शकपणे खर्च व्हावा, विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांच्या कराच्या पैशांचा योग्य उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत कोपरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. आपण केलेल्या आरोपांबाबत आवश्यक ते पुरावे संबंधित यंत्रणांसमोर सादर करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोपरकर यांनी केलेल्या आरोपांमुळे महागावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नगरपंचायतीतील कथित गैरप्रकार, हस्तक्षेप आणि टक्केवारीच्या राजकारणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



