काळी-दौलत वनपरिसरात पुन्हा वाघाची दहशतलेवा येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासराची शिकार; वनविभागाच्या विलंबामुळे संताप

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी-दौलत वनपरिसरात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, लेवा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासराची शिकार झाल्याची घटना सोमवारी (दि. १५ जून) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेवा येथील शेतकरी मोहन रावसाहेब देशमुख यांच्या गोठ्यातील वासरावर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. सकाळी गोठ्यातील वासराचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.
काळी-दौलत सर्कल परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत वनविभागाकडून पंचनामा करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविणे, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाने तातडीने पावले उचलली नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



