Uncategorized

अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी दगडथरमध्ये दीड महिन्यातील दुसरी घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील दगडथर गावात मंगळवारी सकाळी अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे.
दगडथर येथील शिवाजी परसराम खराटे (वय ४६) हे सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास भावाच्या शेतातून बैल आणण्यासाठी जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने झडप घालत त्यांच्या शरीराच्या पार्श्वभागावर गंभीर जखमा केल्या. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, शिवाजी खराटे रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी कोसळले.
आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी खराटे यांना प्रथम उमरखेड येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


शिवाजी खराटे हे कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याने या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने तातडीची आर्थिक मदत, विशेष भरपाई तसेच कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दीड महिन्यात अस्वलाचा दुसरा हल्ला
दगडथर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यापूर्वी याच गावातील शेतकरी उत्तम मारोती खराटे (वय ५५) यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांचे दोन्ही डोळे निकामी झाले असून ते अद्यापही जीवन-मरणाशी झुंज देत आहेत.
या घटनेनंतरही वनविभागाने प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. आज पुन्हा झालेल्या हल्ल्यानंतर दगडथरसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने अस्वलांचा व इतर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button