मच्छी विक्रेत्यांचा एल्गार; जीर्ण भिंत पाडा, बाजाराला सुविधा द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड शहरातील करोडी रोडवरील मच्छी मार्केटमधील अत्यंत जीर्ण व धोकादायक भिंत तात्काळ पाडून बाजाराची जागा वाढवून द्यावी, नवीन प्रवेशद्वार उभारावे तसेच स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, या मागण्यांसाठी मच्छी विक्रेत्यांनी सोमवारी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मच्छी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, मच्छी मार्केटमधील भिंत अत्यंत जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मच्छी विक्रेत्यांनी केला आहे.
विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, बाजारात पुरेशी जागा नसल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे. बाजाराला व्यवस्थित प्रवेशद्वार नाही, स्वच्छ पाण्याची सुविधाही अपुरी आहे. यामुळे ग्राहकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून २४ तासांच्या आत दुकाने हलविण्याबाबत नोटीस देण्यात आली, मात्र पर्यायी व्यवस्था किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाची भूमिका विरोधाभासी असल्याची टीका विक्रेत्यांनी केली.
मच्छी विक्रेत्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, धोकादायक भिंत पाडून जागा मोकळी करणे, नवीन गेट उभारणे आणि पाण्याची व्यवस्था करणे या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवण्याऐवजी तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी मच्छी विक्रेत्यांनी केली आहे. आता नगर परिषद प्रशासन या मागण्यांवर किती तत्परतेने निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



