Uncategorized

बिजोरा टोल नाका बनला अपघातांचा केंद्रबिंदू; सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
बिजोरा येथील टोल नाका हा अपघातांचा केंद्रबिंदू बनला असून या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टोल नाका सुरू झाल्यापासून अनेक गंभीर अपघात घडले असून काही घटनांमध्ये जीवितहानीही झाली आहे. तरीदेखील टोल व्यवस्थापनाकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.


रविवार, दि. 31 मे 2026 रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास एका ओव्हरलोड ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला. ट्रकने प्रथम एका मारुती व्हॅनला धडक दिली आणि त्यानंतर टोल नाक्यावरील एका बाजूची संरचना अक्षरशः उद्ध्वस्त केली. धडकेनंतर वाहन रस्त्यालगतच्या दिव्याच्या खांबावर जाऊन आदळले. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेक वेळा ओव्हरलोड ट्रक चालकांचे नियंत्रण सुटून टोल नाक्याचे नुकसान झाले आहे. काही घटनांमध्ये पेट्रोल पंप परिसरात तसेच दुचाकींना धडक देऊन गंभीर अपघात घडले आहेत. तरीही टोल नाक्यावर पुरेशा सुरक्षाव्यवस्था, संरक्षक बॅरिकेड्स, आपत्कालीन सुविधा किंवा वाहतूक नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
नागरिकांनी आरोप केला आहे की, टोल व्यवस्थापनाकडून केवळ महसूल वसुलीवर भर दिला जात असून प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात येथे आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही वाहनचालकांनी सांगितले.


या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाने या टोल नाक्यावरील अपघातांची सविस्तर चौकशी करून सुरक्षा निकषांनुसार आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बिजोरा परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
तसेच उमरखेड-महागाव मतदारसंघाचे आमदार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्यापूर्वी टोल नाक्यावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button