शहराच्या विकासापेक्षा गरीबांचे पोट महत्त्वाचे; हिमायतनगरमध्ये आधी पुनर्वसन करा, मगच अतिक्रमण हटवा – माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद

हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खय्यूम)
हिमायतनगर:
शहरात प्रशासनाकडून सुरू असलेल्या संभाव्य अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सध्या गरीब व्यावसायिक आणि टपरीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी प्रशासकीय घाईवर तीव्र आक्षेप घेतला असून, “शहराच्या नावाखाली गरीबांच्या पोटावर मारू नका,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सध्या शहरातील शेकडो कुटुंब हे रस्त्याकडेला असणाऱ्या टपऱ्या, भाजीपाला, पानटपऱ्या आणि चिकन-मटन विक्री सारख्या लहान व्यवसायांवर अवलंबून आहेत. वाढत्या महागाईच्या काळात आधीच सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असताना, जर कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक कारवाई झाली, तर अनेक कुटुंबांवर थेट उपासमारीची वेळ येईल. यामुळेच केवळ कायद्याचा बडगा न उगारता प्रशासनाने यात संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या:
आधी पुनर्वसन, मगच मोहीम: रस्ते मोकळे करणे आणि शहराचे सौंदर्य वाढवणे आवश्यक असले, तरी प्रशासनाने प्रथम या लहान व्यावसायिकांना हक्काची पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे.
चर्चेतून सन्मानजनक तोडगा: स्थानिक प्रशासनाने सर्व लहान दुकानदारांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करूनच पुढील पाऊल उचलावे.
सर्वसमावेशक विकास हवा: “सर्वसामान्यांचा रोजगार हिरावून शहराचा कोणताही विकास होऊ शकत नाही. विकासाच्या प्रक्रियेत गरीबांच्या जगण्याचा आणि त्यांच्या हक्काचा विचार झालाच पाहिजे,” असे स्पष्ट मत मोहम्मद जावेद यांनी मांडले.



