महागाव येथे गोरक्षक हत्येप्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव येथे आज दि. २७ मे २०२६ रोजी समस्त हिंदू समाज व गोरक्षक बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना तहसीलदार, महागाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, गोरक्षकांना संरक्षण द्यावे तसेच मृत गोरक्षक स्व. गजानन मारोती सुरोशे यांच्या कुटुंबास आर्थिक मदत व सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गाय ही भारतीय संस्कृती, हिंदू समाजाची श्रद्धा व सनातन परंपरेचे प्रतीक असून गोवंश संरक्षण हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र राज्यात अवैध गोवंश तस्करी, गोहत्या आणि गोरक्षकांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दि. २४ मे २०२६ रोजी मौजे सुकळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत असताना गजानन मारोती सुरोशे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून गोसेवा व हिंदू समाजाच्या श्रद्धेवर झालेला आघात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर अंमलबजावणी करावी, अवैध गोवंश तस्करी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच गोरक्षक आणि गोसेवकांना विशेष सुरक्षा द्यावी, स्व. गजानन सुरोशे यांना “शहीद गोरक्षक” घोषित करावे, त्यांच्या कुटुंबास किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व सरकारी नोकरी द्यावी, तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.



