महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार पोर्टलच्या संथ गतीमुळे उमरखेड तालुक्यात विद्यार्थी-पालक त्रस्त

प्रतिनिधी
एस पी दळवी
उमरखेड (जि. यवतमाळ) – शाळा-महाविद्यालय प्रवेशासाठी लागणारी विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी उमरखेड तालुक्यातील विद्यार्थी आणि पालक वर्ग सध्या महा-ई-सेवा केंद्र आणि ‘आपले सरकार’ पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हैराण झाले आहेत.
तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. त्यासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपले सरकार पोर्टल अत्यंत संथ गतीने चालत आहे. त्यातच वारंवार होणारे बदल आणि सर्व्हर डाऊनमुळे अर्ज अपलोड होत नाहीत आणि पावतीही मिळत नाही.
महा-ई-सेवा केंद्र चालकांनी सांगितले की, “दिवसाला भरपूर अर्ज येतात, पण पोर्टल १०ते १५ मिनिटांनी लॉक होतो. एका अर्जासाठी अर्धा तास लागतो. त्यामुळे रांगा वाढल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.”
पालकांचा आरोप आहे की, प्रवेशाची अंतिम तारीख जवळ आली असताना प्रमाणपत्रेच मिळत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.
या संदर्भात तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “पोर्टलची गती वाढवण्यासाठी वरिष्ठांकडे कळवले आहे. तांत्रिक अडचणी दूर होताच बॅकलॉग तातडीने निकाली काढू,” असे कळविले आहे
ऑनलाईन प्रक्रियेचा उद्देश सुलभता देणे हा आहे, परंतु ग्रामीण भागात सर्व्हर आणि नेटवर्कची समस्या असल्याने उलट त्रास वाढतो. जोपर्यंत पोर्टल स्थिर होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पर्याय किंवा मुदतवाढ देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी उमरखेड तालुक्यातील विद्यार्थी व पालक वर्ग करत आहेत.



