नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात टळला

अंबोडा-खडका दरम्यान शेळ्यांनी भरलेली मॅक्स पिकअप पलटी; चालक जखमी
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोज
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील अंबोडा-खडका दरम्यान शुक्रवारी दुपारी शेळ्यांची वाहतूक करणारी मॅक्स पिकअप (एमएच २९ बी ४४७०) अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. वाहन पलटी होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गाडीत अडकलेल्या सर्व शेळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, एकाही शेळीला इजा झाली नाही.
अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून शेळ्यांना पुढील ठिकाणी रवाना करण्यात आले. चालकावरील प्रसंगावधान आणि नागरिकांच्या तत्पर मदतीमुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती.



