“यवतमाळला हवा आता ‘विकासाचा विजय थलपती’ !” — विधान परिषद निवडणुकीत साहेबराव कांबळे यांच्याकडे जिल्ह्याच्या आशा केंद्रित

मुख्य संपादक शेख इरफान
उमरखेड:-यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सक्षम आणि परिणामकारक नेतृत्वाचा अभाव असल्याने शेतकरी, दलित, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या “जैसे थे” असल्याची तीव्र भावना आता उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे. शासनाच्या योजना असोत, पीक विमा असो किंवा उद्योगधंदे — प्रत्येक बाबतीत यवतमाळ जिल्हा मागे पडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
नुकत्याच राज्यात जाहीर झालेल्या पीक विमा वाटपात अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा दुय्यम वागणूक मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. “विदर्भात सर्वाधिक ऊन, वारा, पाऊस, गारपीट सहन करणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ; पण मदतीच्या वेळी मात्र शासनाकडून तुटपुंजी मदत!” असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, शेजारील Nanded जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळते, मग यवतमाळला का नाही? या प्रश्नावर आता गावागावात चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांच्या मते, “याचे मूळ कारण म्हणजे जिल्ह्यातील कमकुवत राजकीय नेतृत्व!”
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची अवस्था देखील दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बाहेरगावचे नेते येऊन कारखाने भाडेपट्टीवर चालवत आहेत, शेतकऱ्यांचा ऊस घेत आहेत आणि आर्थिक चक्र फिरवत आहेत; मात्र यवतमाळमधील स्थानिक नेतृत्वाला स्वतःचे कारखाने वाचवता आले नाहीत, अशी बोचरी टीका आता उघडपणे होत आहे. एकेकाळी शेतकऱ्यांची “कामधेनू” मानले जाणारे कारखाने बंद पडले, पण काही नेत्यांचे महाल मात्र उभे राहिले, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेतून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व मित्र पक्षांकडून Sahebrao Kamble यांचे नाव पुढे आल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. उमरखेडचे साहेबराव कांबळे हे विकासाभिमुख, अभ्यासू आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
“जात-पात, धर्म, पंथ आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाला मतदान केले, तर यवतमाळ जिल्ह्याला एक नवा उमदा आणि आक्रमक विकासपुरुष मिळू शकतो,” असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. काँग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते देखील साहेबराव कांबळे यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांच्या मते, साहेबराव कांबळे विधान परिषदेत पोहोचले तर जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे, रोजगार, शेतकरी प्रश्नांवर आक्रमक पाठपुरावा आणि शासनाच्या योजना खेचून आणण्याची नवी ताकद निर्माण होऊ शकते.
“यवतमाळला आता केवळ नेता नको, तर लढवय्या विकासाचा विजय थलपती हवा आहे… आणि तो चेहरा म्हणजे साहेबराव कांबळे!” अशा जोरदार प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत.



