
सहसंपादक शेख मुजाहिद मो नं 7798306192
आजच्या काळात शिक्षण आणि नोकरी हे जणू एकाच चौकटीत बंदिस्त झालेले दिसतात. “शिक्षण पूर्ण झालं म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे,” यावर पंकज गारशेटवाड यांचे मत हा विचार आज अनेक विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसला आहे. परंतु शिक्षणाचा खरा उद्देश फक्त नोकरी मिळवणे इतकाच आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज अनेक विद्यार्थी परीक्षा, निकाल आणि निवड यालाच आयुष्य समजू लागले आहेत. एखाद्या परीक्षेत अपयश आले किंवा अपेक्षित नोकरी मिळाली नाही, तर अनेकजण मानसिक तणावात जातात. काही विद्यार्थी स्वतःला अपयशी समजू लागतात. ही परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे. कारण एखादी परीक्षा किंवा निवड हे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही.
आपल्या समाजात अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी फक्त पैसा कमावण्याचा विचार केला असता तर ते स्वतःसाठी मोठं साम्राज्य उभं करू शकले असते. पण त्यांनी समाजासाठी काम करण्याचा मार्ग निवडला. शिक्षणाचा उपयोग त्यांनी माणसं घडवण्यासाठी, समाज बदलण्यासाठी आणि वंचितांसाठी आवाज उठवण्यासाठी केला. त्यामुळेच आजही त्यांची विचारधारा जिवंत आहे.
आजची तरुण पिढी मात्र अनेकदा शिक्षणाकडे केवळ नोकरीच्या दृष्टीने पाहताना दिसते. पण प्रत्येक माणसामध्ये वेगळी क्षमता, वेगळं कौशल्य आणि काहीतरी वेगळं करण्याची ताकद असते. माणूस काय करू शकतो हे त्याला स्वतःपेक्षा चांगलं कोणीच ओळखू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या चौकटीत स्वतःला मर्यादित न ठेवता, स्वतःची खरी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जर प्रत्येकाने फक्त नोकरीचाच विचार केला, तर समाजासाठी काम कोण करणार? शेतीमध्ये मेहनत कोण करणार? सामाजिक बदलासाठी पुढे कोण येणार? समाजाला फक्त कर्मचारी नाहीत, तर संवेदनशील, विचार करणारे आणि जबाबदार नागरिक देखील आवश्यक असतात.
आज गरज आहे ती विद्यार्थ्यांनी अपयशाकडे शेवट म्हणून न पाहता, त्यातून शिकण्याची. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण संघर्षातूनच माणूस घडत असतो. शिक्षण हे फक्त पैसे कमवण्यासाठी नसून योग्य विचार, माणुसकी आणि समाजाची जाणीव निर्माण करण्यासाठी असते.
“विद्यार्थ्यांनी स्वतःला एका निकालापुरतं मर्यादित न ठेवता, आयुष्याकडे मोठ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.”
✍️ पंकज गारशेटवाड



