बनावट नोंदी आढळल्यास विभागीय कारवाईचा इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश मातूरकर यांनी बुधवारी महागाव येथील बांधकाम उपविभाग कार्यालयाला अचानक भेट देत तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच कनिष्ठ अभियंत्यांच्या निष्क्रियतेबाबत त्यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली.
कनिष्ठ अभियंता काळे व पारधी यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरत, कामात कोणतीही कुचराई अथवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला. “कामांची नियमित पाहणी करा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
महागाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, नूतनीकरण, खडीकरण व डांबरीकरणाची अनेक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी अभियंत्यांचे नियंत्रण नसल्याने काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याच्या तसेच कामे संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. बरेच दिवसापासून कामे प्रलंबित आहे अशा परिस्थितीत
स्थानिक स्तरावर अशी चर्चा आहे की काही कनिष्ठ अभियंते नियमितपणे कामांच्या ठिकाणी भेट देत नसून कार्यालयातच थांबून बिले तयार करण्यात व्यस्त असतात. परिणामी सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता महेश मातूरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. प्रत्येक कामाची माहिती घेऊन कामांची सद्यस्थिती, तांत्रिक बाबी, वापरले जाणारे साहित्य आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची सविस्तर चौकशी त्यांनी केली.
“शासकीय निधीतून होणारी विकासकामे ही जनतेच्या पैशातून केली जातात. त्यामुळे कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. अभियंत्यांनी नियमित उपस्थित राहून तांत्रिक देखरेख ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विश्रामगृहाच्या देखभालीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विश्रामगृहाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता पारधी यांच्याकडे असताना प्रत्यक्षात केवळ दोनच कर्मचारी कार्यरत असून, कागदोपत्री चार कर्मचारी दाखविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात तात्काळ खुलासा मागवून कामकाज नियमाप्रमाणे चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता अथवा बनावट नोंदी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम कार्यकारी अभियंता महेश मातूरकर यांनी दिला.
या अचानक भेटीनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागात एकच खळबळ उडाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली होती. अनेक दिवसांपासून रखडलेल्या तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत ही भेट देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात तालुक्यातील सर्व विकास कामांवर नियमित नियंत्रण ठेवून गुणवत्तेची खात्री केली जाणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.



