पुसद बाजार समितीतील वजन काटा घोटाळ्याचा भंडाफोड एकाच गव्हाच्या गाडीचे २४ मिनिटांत दोन वेगवेगळे वजन; शेतकऱ्यांत संताप

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
पुसद, ता. १६ : पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू खरेदीदरम्यान वजन काट्यात मोठी तफावत आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच गव्हाच्या गाडीचे अवघ्या २४ मिनिटांच्या अंतराने करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या वजनांमध्ये तब्बल १ क्विंटल ७५ किलोचा फरक आढळून आल्याने बाजार समितीतील वजन काट्यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमटी कुंभारी येथील गहू उत्पादक शेतकरी देवराव व्हल्डगीर हे आपला गहू विक्रीसाठी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन आले होते. वरूड येथील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर प्रथम वजन करण्यात आले असता गाडीतील गव्हाचे वजन ४२ क्विंटल ३५ किलो भरले. मात्र वजनाबाबत संशय आल्याने संबंधित शेतकरी व उपस्थितांनी पुन्हा वजन करण्याची मागणी केली.

यानंतर अवघ्या २४ मिनिटांनी त्याच गाडीचे पुन्हा वजन करण्यात आले असता गव्हाचे वजन ४२ क्विंटल १० किलो भरल्याचे समोर आले. एकाच गाडीच्या वजनात एवढा मोठा फरक आढळल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या मालाचे वजन चुकीचे करून आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्याचा आरोप शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच यापूर्वी बाजार समितीत विक्री झालेल्या मालाच्या वजन नोंदींचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत ठाणेदारांनी वजन काट्याची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच याआधी किती शेतकऱ्यांचा माल कमी वजनाने खरेदी करण्यात आला याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



