Uncategorized

महागाव तालुक्यात जलयुक्त शिवार कामांवर प्रश्नचिन्ह शिरमाळ, कोनधरी व मोहदी परिसरातील बंधाऱ्यांच्या कामांबाबत शेतकऱ्यांचा आरोप


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या डाळीचे बंधाऱ्यांच्या कामांवर स्थानिक शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. शिरमाळ, कोनधरी व मोहदी परिसरात सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असून तांत्रिक निकषांचे पालन केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात कृषी विभागामार्फत या भागात डाळीचे बंधारे बांधण्याची कामे मंजूर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे, मृदसंधारण करणे व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांमध्ये दर्जाचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंधाऱ्यांची आवश्यक खोली, रुंदी व मजबुती राखली जात नसून काही ठिकाणी केवळ माती टाकून काम पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत असून पहिल्याच पावसात बंधारे वाहून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी केली आहे. गुणवत्ता तपासणीचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या योजनेतील कामे टिकाऊ व दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, या सर्व कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button