आरोग्यदेश-विदेशशहर

हिमायतनगरमध्ये हृदयद्रावक घटना: स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप बालकाने गमावला जीव; संतप्त नातेवाईकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी


​हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खय्यूम):
येथील एका नवनिर्मित स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षांच्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. सक्षम गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे शहरासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम हा आपल्या आजोळी भिसी येथे सुट्ट्यांसाठी आला होता. त्याने हिमायतनगर शहरातील नवनिर्मित ‘गिरीजा स्विमिंग पूल’मध्ये पोहण्यासाठी जाण्याचा हट्ट आपल्या आईकडे धरला होता. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन दुपारी स्विमिंग पूलवर गेली होती. सक्षम आत पोहण्यासाठी गेला आणि त्याची आई बाहेर त्याची वाट पाहत थांबली होती.
​एका तासानंतर उघड झाली घटना
पोहण्यासाठी दिलेली एक तासाची वेळ संपूनही सक्षम बाहेर न आल्याने त्याच्या आईने व्यवस्थापनाकडे विचारपूस केली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली असता, सक्षम हा स्विमिंग पूलच्या पाण्याच्या तळाशी मृतावस्थेत आढळला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
​सुरक्षेचा बोजवारा आणि नातेवाईकांचा आक्रोश
या घटनेनंतर सक्षमच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षित जीवरक्षक (लाईफ गार्ड) तैनात नसल्याचा आणि व्यवस्थापनाने सुरक्षेची कोणतीही पुरेशी काळजी न घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या हलगर्जीपणामुळेच सक्षमचा बळी गेला असून, संबंधित स्विमिंग पूल चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.
​या घटनेमुळे हिमायतनगर शहरात शोककळा पसरली असून, विनापरवाना किंवा विनासुरक्षा चालणाऱ्या स्विमिंग पूलच्या मुद्द्यावर आता प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button