
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
येथील ग्रामीण रुग्णालयाची भव्य दोन मजली इमारत आज केवळ एक शोभेची वास्तू म्हणून उभी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत रुग्णांना सेवा देण्याऐवजी ‘सफेद हत्ती’ ठरत असून, प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
मतदानापुरतेच ‘हमदर्द’?; गरिबांच्या जीवाशी खेळ
जनतेने मोठ्या आशेने आणि विश्वासाने आमदार आणि खासदारांना निवडून दिले. मात्र, आज गरिबांच्या हक्काच्या रुग्णालयात साध्या सोयी नसल्याने “तुम्हाला आमची आठवण फक्त मतदानापुरतीच येते का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. श्रीमंतांकडे खाजगी रुग्णालयांचे पर्याय आहेत, पण गरिबांनी नक्की जायचे कुठे?
माणुसकीचा आधार: इंडिया वॉटरचा पुढाकार
रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची इतकी भीषण टंचाई आहे की, रुग्णांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती पाहून इंडिया वॉटरचे शेख जावेद भाई यांनी माणुसकीच्या नात्याने दररोज १० पाण्याचे कॅन मोफत देण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला खासगी व्यक्ती मदतीचा हात देत असताना, दुसरीकडे शासन मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही असमर्थ ठरत आहे.
मशिनरी धूळखात, ‘रेफर’चा जाच कायम
हैरानीची बाब म्हणजे रुग्णालयात लाखो रुपयांच्या आधुनिक मशिनरी असूनही त्या केवळ फिटिंगअभावी धूळखात पडल्या आहेत. परिणामी, प्रत्येक रुग्णाला नांदेडला ‘रेफर’ केले जाते. तालुका होऊन २७ वर्षे उलटली तरी रुग्णांना नांदेडला पळावे लागणे, हे लोकप्रतिनिधींचे मोठे अपयश आहे. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत आणि स्वच्छतागृहात पाणीही नाही.
प्रशासनाने ‘कुंभकर्णी झोप’ सोडावी
संविधानाने दिलेल्या आरोग्य हक्काची येथे सर्रास पायमल्ली होत आहे. केवळ इमारतीचे सौंदर्य पाहण्याऐवजी तेथे रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार व्हावेत. आमदार साहेब, खासदार महोदय आणि नगर पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी, हीच सर्वसामान्यांची आर्त हाक आहे.



