रहीम डीपी परिसर अंधारात: लाईनमन शिंदे यांच्या तत्परतेने वीजपुरवठा सुरू, मात्र १०० केव्ही ऐवजी २०० केव्ही ट्रान्सफॉर्मरची आग्रही मागणी

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): येथील महावितरण अंतर्गत रहीम डीपीचा रात्री १२ वाजता अचानक फेज उडाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. या कठीण प्रसंगी रात्रीच्या वेळी संकट ओळखून तात्काळ धाव घेणारे आणि कर्तव्याला प्राधान्य देणारे लाईनमन शिंदे साहेब यांनी मोलाची कामगिरी बजावली. “शिंदे साहेब कधीही मध्यरात्री सुद्धा फोन उचलतात, तात्काळ धावून येतात आणि लाईट चालू करूनच जातात,” अशी साक्ष यावेळी अतुल्लाह खान यांनी दिली. त्यांच्या या तत्परतेमुळे वीजपुरवठा सुरळीत झाला असून, अतुल्लाह खान, शेख इलियास खुरेशी, शेख फेयाज ,रफीक (वेल्डिंगवाले), जुनैद ,आणि समीर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी शिंदे साहेब, यांचे विशेष आभार मानले.
१०० केव्ही ऐवजी २०० केव्ही डीपीची मागणी (तीन वेळा दिले निवेदन)
सध्या या परिसरात केवळ १०० केव्ही क्षमतेची डीपी कार्यरत आहे. मात्र, परिसराचा विस्तार आणि वाढता भार पाहता हा १०० केव्हीचा ट्रान्सफॉर्मर लोड टिकता नाही, अशी जाहीर चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. येथील वाढता लोड लक्षात घेता, १०० केव्ही ऐवजी २०० केव्ही क्षमतेची नवीन मोठी डीपी मंजूर करावी, यासाठी नागरिकांनी आतापर्यंत तीन वेळा महावितरण कार्यालयात रीतसर निवेदन दिले आहे. महावितरणने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन येथे तात्काळ २०० केव्हीची डीपी बसवावी, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाढता लोड, डासांचा डंख आणि आजारांची भीती
नागरिकांचे हाल: याच लोडच्या समस्येमुळे परवा दि. ५ जुलै रोजी सुद्धा दुपारी ३ ते ४ वाजल्यापासून रात्रीपर्यंत वीज गायब होती; ज्यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली.
अंधार आणि डासांचा त्रास: लाईट गेल्यानंतर पंखे बंद झाल्यामुळे उकाडा प्रचंड वाढतो. अशातच अंधाराचा फायदा घेऊन डासांचे थवेच्या थवे नागरिकांवर तुटून पडतात. रात्रभर डास टोचत राहिल्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना डोळ्याची पातीही मिटता आली नाही.
आरोग्याचा गंभीर धोका: या दीर्घकाळ चाललेल्या अंधारामुळे आणि डासांच्या प्रचंड त्रासामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे घातक आजार पसरण्याची तीव्र भीती निर्माण झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, येथे तातडीने १०० केव्ही बदलून २०० केव्हीची मोठी डीपी बसवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.



