Uncategorized

गुंज–कलगाव रस्त्यावरील डागडुजीत गैरव्यवहाराचा ग्रामस्थांचा आरोप; ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी (भाग-२)

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील गुंज–कलगाव रस्त्यावरील डागडुजीच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत सवना, गुंज, कलगाव, वेणी व वाकोडी परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी (दि. ६ जुलै २०२६) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देत संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग, महागाव यांच्या देखरेखीखाली गुंज ते कलगाव रस्त्याच्या डागडुजीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचे बिल काढण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दर्जेदार डागडुजी न करता केवळ थातूरमातूर काम करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान आमदार तसेच लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उंबरखेड मतदारसंघातील आमदारांनी रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला. तसेच रस्त्याच्या कामाबाबत वारंवार पाठपुरावा करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

तहसीलदार अनुपस्थित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू करून पूर्ण न झाल्यास बेमुदत चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button