रस्त्याच्या दुरवस्थेवर ग्रामस्थांचा संताप; आमदार-खासदारांविरोधात घोषणाबाजी, आठ दिवसांचा अल्टिमेटम

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना, गुंज, कलगाव, वेणी व वाकोडी येथील ग्रामस्थांनी कलगाव–गुंज मार्गाच्या दुरवस्थेविरोधात सोमवारी (दि. ६ जुलै) तीव्र आंदोलन छेडत आमदार व खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कलगाव–गुंज रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून काम पूर्ण करावे, अन्यथा आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अनुपस्थित असल्याने चव्हाण बाबू यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कलगाव ते गुंज हा प्रमुख मार्ग गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून अनेक वेळा संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी काम अद्याप झालेले नाही.
या मार्गावर साखर कारखाना, सूतगिरणी, आयटीआय, महाविद्यालय, शासकीय कार्यालये तसेच ग्रामीण रुग्णालय असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व रुग्ण या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान आमदार किसन वानखडे यांच्या विरोधात तसेच खासदार नागेश पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध वक्त्यांनी भाषणातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास बेमुदत चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.



