इंग्रजांच्या गुलामगिरीपेक्षाही भयानक ‘आझाद’ भारतातील दुजाभाव; वार्ड १३ मध्ये लोकशाहीचा खून!

हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खय्यूम):
देश स्वतंत्र होऊन ७८ वर्षे उलटली, तरीही हिमायतनगरच्या वार्ड क्रमांक १३ मधील मातंग आणि मुस्लिम वस्त्यांची परिस्थिती पाहून “स्वतंत्र भारत” खरोखर गरिबांसाठी आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. इंग्रजांच्या काळातही प्रशासकीय शिस्त होती, परंतु आज लोकशाहीत जनतेच्या मतावर निवडून आलेले प्रतिनिधीच जनतेला नरकयातना देत आहेत. श्रीमंत वस्त्यांमध्ये सोयींचा पाऊस पडत असताना, गरिबांच्या नशिबी मात्र फक्त कचरा आणि कोरडे नळ उरले आहेत.
नगरसेवकाचा मुजोरपणा: स्वातंत्र्याचा अर्थ ‘हुकूमशाही’ का?
नागरिक अब्दुल हमीद खुरेशी यांनी जेव्हा या पक्षपाती कारभाराबद्दल जाब विचारला, तेव्हा नगरसेवकाने दिलेली मुजोर आणि उर्मट उत्तरे ही आझाद भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. गरिबांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवणारा हा अहंकार प्रशासनाचा खरा चेहरा उघड करतो. संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराला वाकुल्या दाखवत, गरिबांना चक्क दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे.

भांडी घेऊन ठिय्या आणि ‘कचरा फेको’ मोर्चा!
या ‘काळ्या’ कारभाराविरुद्ध आता आझाद देशातील नागरिक आक्रमक झाले आहेत. स्वातंत्र्यातही जर हक्काचे पाणी आणि स्वच्छता मिळत नसेल, तर आता रस्त्यावर उतरून लढा देण्याशिवाय पर्याय नाही. वॉर्डातील नागरिक लवकरच हातांत रिकामे हंडे आणि वस्तीतील कचरा घेऊन नगर पंचायतीवर धडकणार आहेत. जोपर्यंत प्रशासन गुडघे टेकत नाही, तोपर्यंत हे दुसरे स्वातंत्र्य युद्ध थांबणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.



