Uncategorized

महागाव तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे रखडली; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ठेकेदारांवर कारवाईचा अभाव


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्ते व पुलांच्या कामांमध्ये आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
सवना–वाकोडी मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असून अद्याप अपूर्ण आहे. वाकोडी–मोरथा मार्गावरील नदीवरील पूल तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुज–माळीगाव रस्त्यावरील पुलाचे काम डिझाइनमधील त्रुटींमुळे रखडल्याचे सांगितले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदली न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या नियमानुसार तीन वर्षांत बदली होणे अपेक्षित असताना काही अधिकारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. महागाव उपविभागातील अभियंत्यांच्या बदल्यांनंतरही कामकाज रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सवना–वाकोडी रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर असूनही दोन वर्षांपासून गिट्टी टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. काही कामे पूर्ण होण्यापूर्वीच ३१ मार्चपूर्वी कंत्राटदारांना निधी वितरित केल्याचा आरोप आहे. तर अनेक लहान कंत्राटदारांचे काम पूर्ण असूनही त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, पुसद विभागांतर्गत महागाव, उमरखेड, पुसद आणि दिग्रस उपविभागांमध्ये काही अभियंते गेल्या पाच ते सात वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने बदली नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button