Uncategorized

निवेदनं, आंदोलनं, व्हायरल बातम्या… तरीही ‘वाऱ्यावर’ तलाठी कार्यालय! प्रशासनाचा निष्क्रियपणा उघड”

प्रहारच्या निवेदनानंतर साफसफाई व वीज व्यवस्था; पण अधिकारी गैरहजर – ग्रामस्थांचा संताप उफाळला

सहसंपादक शेख मुजाहिद

बाळदी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील तलाठी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात ५ एप्रिल २०२३ रोजी प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनानंतर प्रशासनाने तत्परतेचा दिखावा करत कार्यालय परिसराची साफसफाई करून वीज व्यवस्था सुरू केली. मात्र, हा केवळ वरवरचा देखावा ठरल्याचे वास्तव आता समोर येत आहे.
दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तलाठी कार्यालय नियमित सुरू झालेले नाही. संबंधित अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी इतरत्र भटकंती करावी लागत असून, प्रशासनाच्या या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा बातम्या प्रकाशित करून मुद्दा उचलून धरला, तरीही प्रशासनावर कोणताही ठोस परिणाम झालेला दिसून येत नाही. यामुळे “निवेदनं आणि बातम्या केवळ कागदावरच राहतात का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी “निवेदनकर्त्याचे नाव घेऊ नका, मी या विषयावर काहीही बोलणार नाही,” अशी भूमिका घेतल्याचे समोर आले. एक जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून अशी टाळाटाळ व संवाद टाळण्याची भूमिका योग्य आहे का? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “अधिकारी पदावर असणाऱ्यांनी जबाबदारीने वागणे बंधनकारक आहे. महिला अधिकारी म्हणून आदर आहे; मात्र अशा प्रकारचा उद्धटपणा आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही.”
प्रशासनावर कायदेशीर दबाव
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर तलाठी कार्यालय नियमित सुरू झाले नाही, तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात उच्चस्तरीय तक्रारी दाखल केल्या जातील.
निष्कर्ष :
“साफसफाई आणि वीजपुरवठा करून प्रशासनाने कर्तव्यपूर्तीचा आव आणला; मात्र प्रत्यक्ष कामकाज बंदच आहे. आता प्रशासन जागे होणार का?” असा थेट सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button