उमरखेडमध्ये कचऱ्याच्या ठिकाणामुळे नागरिक हैराण; नगरपरिषद प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील मुरली शेठ यांच्या मळ्याजवळ निर्माण झालेल्या कचऱ्याच्या अनधिकृत ठिय्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून या गंभीर समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
दररोज कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या मध्ये बरेच नागरिक कचरा न टाकता आपले घर स्वच्छ नीट नेटके ठेवून नियोजित वर्दळीच्या मार्गावरच कचरा टाकत असल्याचे समोर आले आहे. याच मार्गावरून जवळच शाळा असल्यामुळे लहान शालेय विद्यार्थी, नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. त्यामुळे दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी वारंवार समज देऊनही काही लोक घरातील कचरा या ठिकाणी आणून टाकत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कचऱ्यातील प्लास्टिक व इतर घातक वस्तूंमुळे मोकाट जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, शहराच्या सौंदर्यालाही तडा जात आहे.
या संदर्भात पत्रकार तथा समाजसेवक सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी विनंती अर्ज देत, सदर कचरा टाकण्याचे ठिकाण(ठिय्या) तात्काळ बंद करून पर्यायी योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
शहर स्वच्छतेच्या गप्पा मारणारे प्रशासन याबाबतीत काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेले आहे.



