निकृष्ट दर्जाच्या पुलामुळे अपघाताचा धोका; चौकशीची मागणी जोरात

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
वाकान ते कोंनदरी मार्गावरील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित पुलाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा पूल बांधकाम करताना दर्जेदार साहित्याचा वापर न करता ठेकेदार व संबंधित कनिष्ठ अभियंता (JE) यांच्या संगनमताने काम करण्यात आले. त्यामुळे अल्पावधीतच पुलाची गुणवत्ता खालावून त्यात तडे, झीज व इतर तांत्रिक दोष दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता पुन्हा पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मागण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यामुळे “जनतेच्या पैशांचा अपव्यय” झाल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून खर्चाची रक्कम वसूल करावी तसेच जबाबदार अभियंते व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाची तांत्रिक पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या अपघातास प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.



