शहर

पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरीसह ८ गुन्ह्यांची उकल, लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ, दि. ९ : पुसद शहर व वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या दोन आणि शेतीविषयक चोरीच्या सहा अशा एकूण ८ गुन्ह्यांची यशस्वी उकल करत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका सराईत आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन १ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

७ जुलै २०२६ रोजी पुसद बसस्थानक परिसरात फिर्यादी अरविंद दारासिंग चव्हाण यांच्याकडून मोबाईल व ३७ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेण्याची घटना घडली होती. तसेच वसंतनगर हद्दीत करण श्रावण राठोड यांना कमी दरात पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसवून देण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन ५ हजार रुपये व दोन चांदीच्या अंगठ्या जबरदस्तीने लुटण्यात आल्या होत्या. या दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहीते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे अयाज अहमद एजाज अहमद (वय ३२, रा. मधुकर नगर, पुसद) व त्याच्या विधीसंघर्षित साथीदाराला बरखा टॉकीज परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

कसून चौकशीदरम्यान आरोपींनी दोन्ही जबरी चोरीचे गुन्हे कबूल केले. त्यांच्या ताब्यातून लुटलेला मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल तसेच १,००,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय आरोपींकडून ८ किलो ५०० ग्रॅम कॉपर वायर जप्त करण्यात आली. चौकशीत पुसद ग्रामीण, खंडाळा, वसंतनगर व महागाव परिसरातील शेतातील मोटार पंप व केबल चोरीचे आणखी ६ गुन्हे उघडकीस आले.

अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचे २ आणि शेतीविषयक चोरीचे ६ असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आणून नागरिकांना दिलासा दिला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुसद शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि. अमोल राठोड तसेच एलसीबीच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असून त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button