महागाव वार्ड क्रमांक १ मध्ये देशी दारू दुकान बंदी मतदान; ‘वाईन बार’ उल्लेखामुळे वाद

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वार्ड क्रमांक १ मध्ये देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यानुसार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी कन्या शाळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निर्णयामुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
जाहीरनाम्यानुसार महिलांचे मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार असून, सायंकाळी ६ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान प्रक्रिया कन्या शाळेतील वर्ग क्रमांक 3 मध्ये पार पडणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या जाहीरनाम्यात देशी दारू दुकानाबरोबरच “बैठक वाईन बार”चा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. संबंधित वाईन बारबाबत कोणतीही ठोस तक्रार नसताना त्याचे नाव का समाविष्ट करण्यात आले, असा सवाल स्थानिक महिलांकडून उपस्थित केला जात आहे.
“हा मुद्दा नेमका आडवा की उभा, हे स्पष्ट होत नाही,” अशी संभ्रमाची भावना नागरिकांमध्ये आहे. या उल्लेखामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या मतदानाकडे लागले आहे.
दरम्यान, प्रशासनाने याबाबत स्पष्टता देऊन मतदान प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



