Uncategorized

जागेच्या वादातून धमक्या; विषप्राशनाची घटना, बेलदरीत खळबळ (पैशांची मागणी व जीवे मारण्याची धमकी; उपचारासाठी उमरखेडहून नांदेडला हलवले)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील बेलदरी येथे जागेच्या जुन्या वादातून निर्माण झालेल्या तणावामुळे एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलदरी येथील विजय पवार यांच्या ताब्यात गेल्या सुमारे २० वर्षांपासून संबंधित जागा असल्याचे सांगितले जाते. मात्र जीवनराव गुलाब आडे यांनी ती जागा स्वतःची असल्याचा दावा करत वाद निर्माण केला. त्यांनी विजय पवार यांच्या घरी जाऊन “ही जागा माझी आहे, पैसे दिले नाहीत तर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच घर खाली केले नाही तर जेसीबी फिरवण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगितले जाते.
या सततच्या धमक्यांमुळे विजय पवार मानसिक तणावाखाली आले असल्याची चर्चा असून, त्यातूनच त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्याचे समोर येत आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.
सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र वेळेत कारवाई होत नसल्यामुळे अशा गंभीर घटना घडत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जागेच्या वादातून धमक्या देणे व त्यातून जीवावर बेतणाऱ्या घटना घडणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून पीडित व्यक्तीस न्याय द्यावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
एकूणच, बेलदरी येथील या घटनेमुळे जागेच्या वादांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button