सेनाद येथे किराणा दुकानातून अवैध दारू विक्री; नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सेनाद येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, किराणा दुकानाच्या आडून देशी-विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा करून विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. संबंधित दुकानात उद्या आयोजित बकऱ्याच्या दावतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दारूचा साठा करण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित किराणा दुकान हे प्रत्यक्षात दारू विक्रीचे अड्डे बनले असून गावामध्ये खुलेआम अशा प्रकारे अवैध व्यवसाय सुरू आहे. यामुळे तरुणांवर व गावाच्या वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी पत्रकार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, दारूबंदी विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “दारूबंदी अधिकारी झोपेत आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सदर प्रकारावर त्वरित छापेमारी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



