शहर

गंभीर निष्काळजीपणा: १९ कोटी मंजूर असूनही वॉर्ड १२ आणि १३ मधील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत; नगरपंचायतीच्या कारभारावर प्रचंड संताप


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी तब्बल १९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून या योजनेचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रेंगाळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील नागरिकांनी अधिकृत पावती फाडूनही त्यांना अद्याप नळ जोडणी देण्यात आलेली नाही. ऐन उन्हाळ्यात गरीब व सामान्य जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​टक्केवारीसाठी जनतेची लूटमार; प्रशासनाने स्वतः नळ जोडणी करावी!
वास्तविक पाहता, ही नळ जोडणी नगरपंचायतीच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. मात्र, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या (कमिशन) हव्यासापोटी कंत्राटदारांची मनमानी वाढली असून याद्वारे गरीब जनतेची उघडपणे आर्थिक लूटमार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला आहे. मग एकाच नाण्याच्या दोन बाजू न करता सर्व वॉर्डांना समान न्याय देणे प्रशासनाचे कर्तव्य नाही का? नगरपंचायत प्रशासन आणि कंत्राटदार केवळ विशिष्ट वॉर्डांमध्ये कामे करून वॉर्ड क्र. १२ आणि १३ मधील गरीब कुटुंबांनाच नळ जोडणीपासून का वंचित ठेवत आहेत, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
​नागरिकांनी मुख्यधाधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. शासनाच्या योजनेतून मोफत किंवा नियमानुसार जोडणी मिळणे अपेक्षित असताना, काही लाभार्थ्यांकडून अधिकृत शुल्काव्यतिरिक्त तब्बल चार हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बेकायदेशीर रक्कमेची (लाचेची) मागणी केली जात आहे. नळ जोडणीचे अधिकृत शुल्क किती आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने सार्वजनिक केलेली नाही.
​कंत्राटदाराला पाठीशी घालू नका; प्रशासनाला इशारा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरिकांनी प्रशासनाला कडक कारवाईची मागणी केली आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर नगरपंचायतीने तात्काळ नियंत्रण मिळवून त्याला कडक आदेश देणे गरजेचे आहे. जर कंत्राटदाराने नियमानुसार आणि वेळेत काम केले नाही, तर त्याचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील सर्व प्रलंबित नळ जोडण्या कोणत्याही भेदभावाशिवाय तात्काळ मंजूर कराव्यात, १९ कोटींच्या निधीचा हिशोब देऊन सर्व वॉर्डांमधील पाईपलाईनचे काम तात्काळ पूर्ण करावे, नळ जोडणीसाठी आकारण्यात येणारे अधिकृत शुल्क सार्वजनिकरित्या जाहीर करावे आणि वॉर्डात सुरू असलेल्या अवैध व अतिरिक्त वसुलीची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
​या मागणीचे निवेदन देताना नागेश शिंदे, सुनील चव्हाण, लक्ष्मण हारडपकर, दिलीप कोंडामंतल, संतोष पडेवार, खोबाजी सुरजकाड, बालाजी चव्हाण, राजू चव्हाण यांच्यासह वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील एकूण ३४ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे असलेले निवेदन देण्यात आले असून परिसरातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगाव आणि तहसीलदार हिमायतनगर यांनाही योग्य कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या गरिबांना न्याय देणार की कंत्राटदाराला पाठीशी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button