इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना! आदिवासी महिलांना अमानुष मारहाण अन् जातिवाचक शिवीगाळ; राम सूर्यवंशीसह तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

( इस्लापूर शेख खय्यूम)
किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपटी येथे सामाजिक सलोख्याला काळीमा फासणारी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात कामासाठी गेलेल्या आदिवासी महिलांना बेदम मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राम सूर्यवंशीसह तीन जणांविरुद्ध इस्लापूर पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इस्लापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुपटी येथील शेतात काही आदिवासी महिला नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्या होत्या. तिथे आरोपींनी महिलांना अडवून अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत जातिवाचक शिवीगाळ केली.
या हल्ल्यात फिर्यादी महिला शकुंतलाबाई ढाले यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे, तर शांताबाई देशमुख यांचाही हात पिरगळल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित महिलांनी तात्काळ इस्लापूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत तक्रार नोंदवली.
यांच्यावर गुन्हा दाखल (आरोपींची नावे):
पीडित महिलेच्या तक्रारीवरून इस्लापूर पोलिसांनी खालील तिघांविरुद्ध विविध कलमांसह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे:
१. सुधाकर पाटील (रा. सोनारी)
२. राम सूर्यवंशी (रा. हिमायतनगर)
३. दत्ता सूर्यवंशी (रा. कुपटी)
पोलीस प्रशासनाची तात्काळ कारवाई:
घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) रामकृष्ण मळघणे यांनी तात्काळ कुपटी येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. इस्लापूर पोलिसांकडून या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असून, “दोषींवर कायद्यानुसार कठोर आणि कडक कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



