महागावातील मातोश्री शाळेत धक्कादायक प्रकार; इंग्रजी वाचन न येणाऱ्या विद्यार्थ्याला सरळ पुढे ढकलले! उपशीर्षक:

पालकाची लेखी तक्रार; “फक्त फी घेण्यासाठी पास” केल्याचा गंभीर आरोप, शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथील मातोश्री प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणाच्या दर्जाबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहावी (सेमी इंग्लिश) मध्ये शिकणाऱ्या संस्कार विजय देवरकर या विद्यार्थ्याला साधे इंग्रजी वाचनही करता येत नसतानाही त्याला पुढील वर्गात पास करण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
विद्यार्थ्याचे वडील विजय देवरकर यांनी शाळेत जाऊन लेखी तक्रार देत प्रश्न उपस्थित केला आहे की, “मुलाला काहीच येत नसताना त्याला पास कसे केले? तसेच शाळेकडून कधीही सूचना देण्यात आल्या नाहीत की मुलगा अभ्यासात मागे आहे.”
या घटनेमुळे शाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना न तपासता सरळ पुढील वर्गात ढकलले जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. “शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला असून, मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
करंजखेड येथील या विद्यार्थ्याला महागावमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तो कोणतेही पुस्तक नीट वाचू शकत नसतानाही पुढे गेला, हे लक्षात आल्यानंतर पालकांना धक्का बसला. घरी वाचन घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
तक्रारीनंतर शाळा व्यवस्थापन समितीकडून पालकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, यामुळेच शाळेतील मनमानी कारभारावर अधिक संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कधी शाळेची प्रत्यक्ष पाहणी (इन्स्पेक्शन) केली का? शाळांना परवानगी देताना गुणवत्ता तपासली जाते का? असे सवाल नागरिकांकडून विचारले जात आहेत.
पालकांनी मागणी केली आहे की, शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासून शाळेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
दरम्यान, या घटनेमुळे इतर पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, “आपल्या मुलांना खरोखर काय येते?” याची खात्री करण्याची वेळ पालकांवर आली आहे.



