महागाव काँग्रेसला नवे नेतृत्व; तालुकाध्यक्षपदी सुनील राठोड तर शहराध्यक्षपदी शैलेश कोपरकर

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव, दि. १८ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महागाव तालुक्यात संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी सुनील राठोड यांची महागाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी, तर नगरसेवक शैलेश कोपरकर यांची महागाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
सुनील राठोड यांनी यापूर्वीही तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना गावागावांत संघटन मजबूत केले असून कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे काँग्रेसला अनुभवी नेतृत्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
शहराध्यक्षपदी नियुक्त झालेले शैलेश कोपरकर यांनी नगरपरिषदेमध्ये सक्रिय भूमिका बजावत विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या, तसेच प्रधानमंत्री आवास, शबरी आवास व रमाई आवास योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील काँग्रेस संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



