मोबाईल हॅक करून बदनामीचा डाव; डी. बी. नाईक यांनी पोलीसांत धाव

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलने करून शेतकरी व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते डी. बी. (धनंजय) नाईक यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या नावाने अश्लील फोटो व व्हिडिओ विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे त्यांची नाहक बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यामागे त्यांची प्रतिमा मलिन करून त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातून दूर करण्याचा कट असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या प्रकरणी डी. बी. नाईक यांनी दि. 19 जुलै 2026 रोजी महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या मोबाईल क्रमांकावर अनधिकृतरीत्या प्रवेश करून अश्लील मजकूर, फोटो व व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. संबंधित अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्ह्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नाईक हे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेचा सखोल तपास करून दोषींना तातडीने अटक करावी, तसेच सायबर माध्यमातून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डी.बी.नाईक व नागरिकांकडून होत आहे. महागाव पोलीस या तक्रारीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.



