लोणेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती; खासदार संजय देशमुख यांच्या निधीतून कामांचा शुभारंभ उपशीर्षक:

हेमाडपंथी प्राचीन मंदिरात भूमिपूजन सोहळा उत्साहात; संत-महंत व मान्यवरांची उपस्थिती
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील पेढी-पोखरी गावाच्या पूर्वेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले प्राचीन लोणेश्वर तीर्थक्षेत्र येथे विकासकामांना अखेर गती मिळाली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या खासदार निधीतून येथे मूलभूत सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
हे लोणेश्वर तीर्थक्षेत्र हे हेमाडपंथी शिल्पकलेचा अप्रतिम नमुना मानले जाते. येथे शिवशंकराचे प्राचीन व जागृत देवस्थान असून “देवाधिदेव महादेव” म्हणून भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे. तसेच याच परिसरात कार्तिक स्वामी यांचे विदर्भातील एकमेव पुरातन मंदिर असल्याची आख्यायिका सांगितली जाते, ज्यामुळे या स्थळाचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
या भूमिपूजन सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. मंदिराचे पुजारी जगदीश महाराज यांनी उपस्थितांचे शाल व श्रीफळ देऊन यथोचित स्वागत केले. यावेळी उज्जैन येथील साधुसंतही विशेष उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महादेवाची आरती करण्याचा मान मान्यवरांना मिळाला.
या प्रसंगी विभागातील ज्येष्ठ नेते दौलतराव नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांबळे साहेब, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व इतर सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
शेतकरी नेते मनीष जाधव यांनी या कार्यक्रमात सहभागी होत या तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या विकासकामांमुळे लोणेश्वर तीर्थक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून, भविष्यात येथे अधिक सोयीसुविधा निर्माण होऊन भाविकांसाठी हे ठिकाण अधिक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.



