घाणमुख ग्रामपंचायतीतील कोट्यवधींचा घोटाळा; उपोषणानंतर हालचाल, दोषींवर कारवाईसाठी ‘१ ते ४’ प्रस्ताव पाठवला!

राम जाधव यांच्या अमरण उपोषणाची सांगता; प्रवीण सलामे यांच्यासह दोषींवर निलंबन व फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
घाणमुख ग्रामपंचायत अंतर्गत उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अखेर प्रशासन हलल्याचे दिसून येत असून, उपोषणाच्या दबावानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी ‘१ ते ४’ प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे संतप्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण छेडत दोषींवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. चौकशी समितीच्या अहवालात कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यासह पाच जण दोषी असल्याचे स्पष्ट नमूद असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर दिनांक 20 मार्च 2026 रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली. संबंधित दोषी अधिकारी, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘१ ते ४’ प्रस्ताव सादर करून त्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात आला आहे.
तसेच, शासनाच्या निधीची वसुली करण्याबाबतही मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार असून, त्यांच्या आदेशानुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, केवळ घाणमुख ग्रामपंचायतच नव्हे, तर महागाव तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही प्रवीण सलामे व काही ग्रामसेवकांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या सर्व प्रकरणांमध्येही शासनाची वसुली व फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
आता प्रत्यक्षात दोषींवर कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



