महागाव नगरपंचायतीच्या इमारतीचा मार्ग अखेर मोकळा; १० कोटी निधीसाठी हिरवा कंदील उपशीर्षक:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका; लोकप्रतिनिधींच्या एकजुटीला यश
महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून, या प्रकल्पासाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नगरपंचायतीच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुकूल भूमिका दर्शवल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीच्या हद्दीत स्वतंत्र प्रशासकीय इमारत नसल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता या नवीन इमारतीमुळे सर्व विभाग एकाच छताखाली कार्यरत होणार असून नागरिकांना अधिक सुलभ व जलद सेवा मिळणार आहे.
या यशामागे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष रंजना दीपक आडे यांनी नगरपंचायतीत सत्ता आल्यानंतर विकासकामांना गती दिली. तसेच उमरखेड-महागाव मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. नगरसेवक व नागरिकांनीही या मागणीसाठी एकजुटीने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, ही प्रशासकीय इमारत जुनी ग्रामपंचायतच्या जागेत उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येत्या काळात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याशिवाय, भिसे पेट्रोल पंप परिसरातील मोकळ्या जागेत भक्ती निवास सभागृह उभारण्याचीही मागणी करण्यात आली असून, यासाठी नगरसेवक सुरेश नरवाडे यांनी निधीची मागणी केली आहे. नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महागाव नगरपंचायतीतील प्रलंबित कामे पुढील आठ महिन्यांत मार्गी लावण्याचा निर्धार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींमुळे महागाव शहराच्या विकासाला गती मिळणार असून प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



