गुढीपाडव्यानिमित्त महागावात रामानंद संप्रदायाची भव्य शोभायात्रा उत्साहात

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शविणाऱ्या गुढीपाडवा निमित्त महागाव येथे रामानंद संप्रदायाच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या शोभायात्रेत हजारो अनुयायी सहभागी झाले होते.
यवतमाळ पश्चिम जिल्ह्यासह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा व कर्नाटक राज्यांतील विविध भागांतही अशाच शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. महागाव येथील शोभायात्रेची सुरुवात जगद्गुरुंच्या प्रतिमेचे भव्य रथात पूजन करून करण्यात आली. रथाचे पूजन महागाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश भाऊ कोपरकर यांच्या हस्ते पार पडले, तर सौ. मंगला बंडुराव आंडगे हे दाम्पत्य यजमान म्हणून उपस्थित होते.
या शोभायात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध व एकसंध रचना. भजनाच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात शोभायात्रा लयबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी उत्सवाला विशेष रंगत आणली. महिला भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग असून कलशधारी व निशानधारी महिला-पुरुष, भजनी मंडळ, लेझीम पथक, राम पंचायतन तसेच मरणोत्तर देहदानावरील देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले.
शोभायात्रेत सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. आयोजकांनी भाविकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली होती. रामानंद संप्रदायामार्फत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात असून महामार्गावरील ॲम्बुलन्स सेवा, मरणोत्तर देहदान व अवयवदान, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत CBSE शिक्षण, सर्व धर्मीय मुलींसाठी वेदपाठशाळा, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान आणि दुर्बल घटकांचे पुनर्वसन यांसारखे उपक्रम उल्लेखनीय आहेत.
जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिमच्या वतीने सुमारे ७०० हून अधिक भक्त सहभागी झाल्याची माहिती जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे यांनी दिली. शोभायात्रेचे थेट प्रक्षेपण युवा टीमकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप सतीश मंगल कार्यालय येथे गुरुमाऊलींच्या सांगता आरतीने करण्यात आला. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष रामदास ठाकरे यांच्यासह युवा सेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना तसेच जिल्हा व तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



