प्रवीण सलामे यांच्या बडतर्फीसाठी राम जाधव यांचे अमरण उपोषण

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
घाणमुख ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यासह एकूण पाच जण दोषी असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, इतरही ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सलामे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, काही अहवालांनुसार शासनाची रक्कम वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महागाव पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची अनेक उदाहरणे चौकशी अहवालातून समोर आली असली तरी संबंधितांवर अद्याप कोणतीही प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर दोषींना तात्काळ सेवेतून बडतर्फ करणे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे, या प्रमुख मागण्यांसाठी राम जाधव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. “जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या उपोषणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



