Uncategorized

कोप्रा–तिवडी–गुरफळी रेतीघाटांवर माफियांचा धुमाकूळ; ‘एका रॉयल्टीवर चार-चार ट्रिप’चा आरोप


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील कोप्रा, तिवडी आणि गुरफळी येथील रेतीघाटांवर सध्या रेती माफियांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. महसूल नियमांना पायदळी तुडवत एकाच रॉयल्टीवर दिवस-रात्र चार-चार रेती ट्रिप काढल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कोप्रा आणि तिवडी घाटांवर नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, अनेक टिप्पर एकाच रॉयल्टीवर सतत फेऱ्या मारताना दिसत आहेत. गुरफळी घाटावर मात्र काही प्रमाणात नियमांचे पालन होत असल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण प्रकारावरून प्रशासनावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उपविभागीय अधिकारी मुळे आणि तहसीलदार सुरडकर हे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, काही घाटचालक कथित “भाऊ” या नावाचा आधार घेत बेकायदेशीर धंदा चालवत असल्याची चर्चा आहे. हा ‘भाऊ’ नेमका कोण? राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती की गुन्हेगारी पार्श्वभूमीचा कोणी? याबाबत संभ्रम असूनही, या नावाचा धाक दाखवत रेती माफिया बेधडकपणे कारभार करत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठी घटनास्थळी क्वचितच दिसतात, अशी तक्रार असून, ते प्रत्यक्ष मैदानात उतरल्यास रेती चोरीला मोठा आळा बसू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली असून,
कोप्रा व तिवडी घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,
कायमस्वरूपी चौकी उभारून २४ तास नियंत्रण ठेवावे,
आणि फक्त वैध रॉयल्टी असलेल्या वाहनांनाच परवानगी द्यावी,
अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button