पावसाने फिरवली पाठ: हिमायतनगरचा शेतकरी भीषण संकटात; “दोन-तीनदा पेरणीला पैसा आणायचा कुठून?”

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): परिसरात पावसाने मारलेल्या दडीमुळे बियाणे मातीतच करपले असून शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. “पहिल्या पेरणीसाठी कर्ज काढले, आता दोन-तीन वेळा पेरणी करायला गरीब माणसाने पैसा कुठून आणायचा?” असा हताश सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि शासकीय नियमांनुसार, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. बँकांकडून सहजासहजी नवीन कर्ज न मिळणे आणि सोयाबीन-कापसाचे पीक करपल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
शेतकऱ्यांची मागणी: शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नियमानुसार तातडीने वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करावेत. बाधित शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, पीक विमा भरपाई आणि सानुग्रह आर्थिक अनुदान त्वरित वितरित करावे.



