महागाव तालुक्यात जुम्मा मज्जिदच्या 38.44 लाखांच्या मोबदल्याचा गैरव्यवहार उघड; माजी अध्यक्षावर गंभीर आरोप

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी दौलत येथील जुम्मा मज्जिदच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी मिळालेल्या 38 लाख 44 हजार 943 रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार दहा महिन्यानंतर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाकडे वादग्रस्त स्वरूपात सुरू असतानाच संबंधित रक्कम जुम्मा मज्जिदच्या नावावरील युनियन बँकेच्या खात्यातून काढून माजी अध्यक्षाने पोबारा केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जुम्मा मज्जिद संस्थेच्या जमिनीच्या मोबदल्याची रक्कम सुमारे दहा महिन्यांपूर्वी युनियन बँकेच्या शाखेत जमा झाली होती. मात्र, त्या काळात संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा वाद महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, औरंगाबाद येथे वादी–प्रतिवादी म्हणून प्रलंबित असताना देखील मिर्झा मृत्युंजा बेग व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय कर्मचारी पतसंस्थेशी संबंधित मुस्लिम सदस्यांची दिशाभूल करून खात्यातील नावात बदल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सध्या जुम्मा मज्जिदचे कार्यकारी जबाबदारी अतिक अहमद खान व त्यांच्या सहकाऱ्यांकडे असताना, माजी अध्यक्ष मिर्झा बेग यांचा मज्जिदच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, संबंधित व्यक्ती काळी दौलत येथे वास्तव्यास नसताना बोर्डाची फसवणूक करून संस्थेच्या विकासासाठी असलेली रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी काढून औरंगाबादकडे पलायन केल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे.
ही रक्कम मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी व संस्थेच्या विकासाकरिता असताना, संस्थेची दिशाभूल करून ती हडप करण्यात आल्याचा आरोप करत शेती खान रहमदिन काझी, वाहक सोहेल खान व समीर उद्दीन काजी यांनी महसूल उपविभाग विभाग व ग्रामीण पोलीस स्टेशन (काळी) येथे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात संबंधित माजी अध्यक्षाने 38 लाख 44 हजार रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप असून, प्रशासन व पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



