कारखेड फाटा येथे १०वी सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषद

- दीपक कदम यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक रत्न’, तर प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांना ‘राष्ट्रीय साहित्यरत्न’ पुरस्कार
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : ग्रामीण भागात मानवी कल्याण आणि प्रबोधनाचे विचार रुजविण्याचे सातत्याने कार्य करणाऱ्या नालंदा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कारखेड फाटा येथे दि. १ मार्च रोजी १०व्या सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली ही परिषद यंदा अधिक व्यापक स्वरूपात पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मोहनराव मोरे तर स्वागताध्यक्ष म्हणून साहेबराव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुरस्कारांनी होणार मान्यवरांचा गौरव
आंबेडकरी मिशनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे दीपक कदम (नांदेड) यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच देश-विदेशात आपल्या साहित्याद्वारे आंबेडकरी विचारांची पेरणी करणारे प्रख्यात साहित्यिक व विचारवंत प्रो. डॉ. अनिल काळबांडे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. भास्कर दवणे यांनी दिली.
धम्म ध्वजारोहण व धम्म देशना
सकाळच्या सत्रात भदन्त पय्याबोधी थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिक्षू संघाच्या सान्निध्यात धम्म ध्वजारोहण आणि धम्म देशना कार्यक्रम होणार आहे.
संविधान विषयावर प्रबोधन
दुपारच्या व्याख्यानमालेत ‘संविधान’ या विषयावर प्रबोधनकार डॉ. भास्कर दवणे, डॉ. अनिल काळबांडे, डॉ. प्रेम हनवते, प्रा. व्ही. एम. कांबळे, गुलाबराव दवणे आणि ज्ञानेश्वर धोंगडे मार्गदर्शन करणार आहेत.
वैचारिक गीतांचा सामना
रात्री वैचारिक गीतांचा रंगतदार सामना शाहीर देवानंद जगताप व दीपाली कांबळे यांच्या सादरीकरणातून रंगणार आहे.
या भव्य धम्म परिषदेचे आयोजन सुधाकर कांबळे, संयोजक सुनिल कवडे, सचिव चंपतराव विणकर, धोंडबाराव विनायत, संघटक सुरेश दवणे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संविधान, समता आणि बौद्ध धम्माच्या विचारांनी ग्रामीण भागात नवी जागृती घडविण्याचा हा प्रयत्न ठरणार आहे.



