बाळदी ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाच्या बदलीसाठी ग्रामस्थांची मागणी

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड (जि. यवतमाळ), दि. 4 फेब्रुवारी 2026 :
बाभळी (ता. उमरखेड) येथील ग्रामस्थांनी ग्रामसेवक श्री. डी. बी. सूर्यवंशी यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 28 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णय (GR) नुसार ग्रामसेवकांच्या बदलीसंदर्भात स्पष्ट निकष व कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र संबंधित ग्रामसेवक मागील सुमारे 5 वर्षांपासून एकाच ग्रामपंचायतीत कार्यरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित अधिकारी 4 वर्षे प्रभारी पदावर व 1 वर्ष कायमस्वरूपी पदावर कार्यरत राहिले असून शासनाच्या बदली धोरणाचे उल्लंघन झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मते, या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता, नागरिकांच्या कामांमध्ये विलंब तसेच आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित ग्रामसेवकाची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी उमरखेड व निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन शासन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



