महागावमध्ये देशी दारूची खुलेआम होलसेल विक्री; दारूबंदी विभागावर प्रश्नचिन्ह

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरात दोन्ही ही देशी दारू विक्रीबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला असून, दारूबंदी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून खुलेआम पेट्यांनी देशी दारूची होलसेल विक्री सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अठरा वर्षांखालील मुलांना देखील खुलेपणाने देशी दारू विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे कायद्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ऑटो पॉईंटच्या आडोशाला संबंधित देशी दारू दुकानातून मोठ्या प्रमाणात पेट्यांनी विक्री सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. संबंधित दुकान आधीपासूनच वादग्रस्त असल्याची चर्चा असून, “आडवी बाटली” आणि निवडणूक प्रक्रियेबाबत दारूबंदी अधिकाऱ्यांच्या सही व्हेरिफिकेशनसाठी पत्र प्राप्त झाले असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र अशा पार्श्वभूमीवरही अवैधरित्या होलसेल विक्री सुरूच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असूनही कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दारूबंदी विभागाने तात्काळ छापा टाकून संबंधित दुकानावर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध होलसेल विक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
महागावमध्ये यापूर्वीही अवैध दारू विक्रीच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र ठोस कारवाईचा अभाव असल्याने अशा प्रकारांना चालना मिळत असल्याचे बोलले जात आहे. आता दारूबंदी अधिकारी या प्रकरणी नेमकी कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



